Thursday, December 30, 2021

 हॅकर्स नी प्रचंड सतवल्याने आणि तब्येत खराब झाल्याने पोहचू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व ! आचार्यांच्या विरुद्ध एक मोहीमच सुरु आहे पण ती पराजित होईल .असो . 

श्रीधर तिळवे नाईक 

मायनॉरिटीला जिंकून मेजॉरीटीला हरवू अशा भ्रमात असाल तर तुमच्या अकलेचं दिवाळं निघालंय असंच म्हंटलं पाहिजे . टिपू सुलतान मला आदरणीय वाटत नाही नाव द्यायचे किंवा घ्यायचे असेल तर मलिक अंबरचे द्या व घ्या 

श्रीधर तिळवे नाईक 

Saturday, February 10, 2018


१८२)ते शेवट 

१८२

काटकसरी हो
पण कंजूस  होऊ नको

मदत कर
पण उधळपट्टी करू नको

आवश्यक असेल
तिथे तुझ्या  मदतीचा हात पोहचव

जो बुडत असेल त्याला वाचव

१८३)
जे फक्त संग्रह करतात
आणि वाटत नाहीत
जे फक्त साठा करतात
पण लोकांत वितरण करत नाहीत
ते माणुसकीचे गुन्हेगार आहेत

१८४)
परलोकातल्या काल्पनिक सोन्यापेक्षा
इहलोकातील  खरे पितळ
हे जास्त मूल्यवान आहे

परलोकाची स्वप्ने पहाण्यापेक्षा
इहलोकातील तुझी स्वप्ने साकार कर
मात्र ती साकारताना
इतरांची  स्वप्ने  साकारायला मदत  कर
किमान त्यांना दुखावू नकोस

१८५)
तू ज्यांना मदत केलीस
ते सारेच परतफेड करणार नाहीत
उपकाराबदली सर्वच उपकार करतील
असे नाही
पण तरीही मदत कर उपकार कर
कारण जेव्हा तुला मदत लागेल
तेव्हा त्यांच्यावर तू उपकार केलेस
वा ज्यांना तू मदत केलीस
त्यापैकीच कोणी तुला मदत करेल
करोडो स्पर्म (sperm) सोडशील
तर त्यातील एक ते पाच सहा फळतील
उरलेले सर्व गायब होतील

तेव्हा मदत अनेकदा कर अनेकांना कर
आणि एखादी फळली तरी
ती फळवणाऱ्याचे आभार मान

१८६)
कुणाचाही वारसा हक्क बुडवू नको
कुणाचाही योग्य वाटा
देताना चुकू नको

ज्यांना जन्मजात
वारसा हक्क मिळालेला नाही
त्यांना तो सरकारमार्फत मिळवून दे
वा स्वतः त्यांना मदत कर

ज्यांचे आईबाप निर्धन  आहेत
त्यांना
त्यांच्या आईबापांच्या निर्धनतेची
शिक्षा मिळणार  नाही
ह्याची काळजी घे

संधी सर्वांनाच मिळायला हवी
आणि ती सर्वांना समानतेने
मिळायला हवी

ज्यांना संधी नाकारली गेलीये
त्यांच्यासाठी संधी तयार कर
आणि जे संधी देऊनही
स्वतःच्या आळसापोटी
व्यसनाधीनतेपोटी
अनाचारापोटी
वाईट सवयींपोटी
तिला वाया घालवतात
त्यांचा सार्वजनिक निषेध कर
आणि त्यांना सुधारगृहात पाठवून दे

१८७)
सर्वांना सारख्याच जागी पोहचता येत नाही
सर्वांना समान उंची गाठता येत नाही
सर्वांनाच  सर्वत्र विस्तारता येत नाही

मात्र ज्याला ज्या जागी पोहचायचे आहे
त्याला त्या जागी पोहचण्याची संधी हवी
ज्याला जी उंची गाठायची आहे
त्याला ती गाठायची  संधी हवी
ज्याला स्वतःचा जो विस्तार करायचा आहे
त्याला तो विस्तार करण्याची संधी हवी

जे अल्पसंतुष्ट आहेत
त्यांना अल्पसंतुष्ट राहण्याचे स्वातंत्र्य हवे

ज्यांना स्पर्धेच्या बाहेर रहायचे असेल
त्यांना स्पर्धेच्या बाहेर राहण्याची मोकळीक हवी

समान आकाराचे ठोकळे
कुरूप दिसतात
विविध आकारांची मांदियाळी
श्रीमंत दिसते

१८८)
माणसे संतंतीसाठी काहीही करू शकतात
म्हणूनच संतंतीला जन्म दे
मात्र तिच्या प्रेमात इतका आंधळा होऊ नको
कि इतरांच्या संतंतीचे त्याने नुकसान होईल

स्वतःच्या संतंतीचे भले कर
पण इतरांच्या संतंतीचे वाईट करता

१८९)
शेजाऱ्यावर प्रेम कर
पण शेजारी चुकीचे वागत असेल
तर गोड शब्दात त्याची चूकही दाखव

तो गुन्हेगार असेल
तर पोलिसांना तसा रिपोर्ट दे

आणि चांगला असेल
तर त्याला नातेवाईकाचा दर्जा दे
शक्य असेल तेवढी मदत कर

१९०)
म्हातारपण कुणाला चुकले ?
तुलाही ते अटळपणे   येणार आहे

सर्वच म्हातारपण शहाणे नसते
आणि सर्वच म्हातारपण अनुभवी नसते
मात्र ज्या म्हातारपणाजवळ अनुभव आहे
शहाणपण आहे
त्याच्याकडून  जरूर शिक

जे खडूस  वा विक्षप्त असेल
त्यांना क्षमा कर
सांभाळ

म्हातारपण असहाय्य दुर्बल असते
त्यांना सहाय्य दे बल दे

तुला हे माहीत आहे का
उष्ण पदार्थ त्याच्यापेक्षा कमी उष्ण पदार्थाला
स्वतःची उष्णता  देऊ शकतो
पण कमी उष्णता असणारा पदार्थ
त्याची उष्णता जास्त उष्णता असलेल्या
पदार्थाला देऊ शकत नाही

सूर्य पृथ्वीला उष्णता  देऊ शकतो
पण पृथ्वी सूर्याला उष्णता देऊ शकत नाही

एक दिवस असा येईल
तुझी उष्णता तुझ्या मुलांपेक्षा कमी होईल
तेव्हा मुले उष्णता घेत नाहीत
म्हणून शोक करू नकोस
मात्र ते उष्णता देत असतील
तर ती आनंदाने घे
आणि तुझ्या कमी उष्णतेची ऊब
त्यांना दे

तुझी कमी उष्णतेची नातवंडे जन्मतील
तुझी उष्णता त्यांची गरज असेल
त्यांना ती उष्णता दे

हा उष्णतेचा प्रवाह
पिढी दर पिढी
चालता ठेव
***
१९१

चांगले आणि वाईट 
दोघेही दुर्दशेच्या तडाख्यात सापडतात 
पण वाईट सापडतात 
तेव्हा त्यांच्या कर्माची फळे म्हणून 
वाईट वाटत नाही 
पण चांगलेही  दुर्दशेच्या 
कचाट्यात सापडतात 
तेव्हा वाईट वाटते 
खरेतर चांगले शक्तिमान नाही 
कारण चांगले अल्पमतात आहेत 
अल्पसंख्य आहेत
तुला चांगले विजयी व्हावे 
असे मनापासून वाटत असेल तर 
चांगल्याच्या मागे उभे रहा 

हे जग न्यूट्रल आहे 
आणि त्याला चांगल्याची कदर नाही 
पण मग चांगल्यापासून पळून जाणार का ?  

चांगले लोक 
ईश्वराचा वापर चांगल्यासाठी करतात 
वाईट लोक ईश्वरालाही वाईटासाठी राबवतात 

सध्या तरी ईश्वर 
वाईट लोकांच्या तावडीत आहे 
कारण तो अस्तित्वात नसल्याने 
तो आपले काहीही बिघडवू शकत नाही 
हे वाईट लोकांना फार चांगले माहित आहे 

म्हणूनच वाईट लोक 
आपले गुन्हे लपवण्यासाठी ईश्वर वापरतायत 

ईश्वरच फाडून टाकशील 
तर वाईट लोकांचे मुखवटे गळून पडतील 

ईश्वर टाकून दे 
चांगल्याच्या चांगले दिवस येतील 
चांगल्याच्या मागे उभा रहा  
***

१९२)
सूक्ष्मदर्शी हो, निर्व्यसनी हो
नित्यासावध रहा 
चांगल्याचा उपदेश कर, चांगल्याची शिफारस कर 
सद्गुण शिकव
जमल्यास सद्गुणांची लागवड कर 

गर्व करू शिकव 
मध्यम गतीने चाल 
मृदू आवाजात बोल 

वृद्धांना सन्मान 
मुलांना आधार 

असा जग 
की जगात जगण्याचे उदाहरण म्हणून 
तुझे आयुष्य लोक एकमेकाला 
क्वोट करशील 

१९३)
जुगार खेळू नकोस 
मटका लावू नकोस 
पैसे लावू नकोस 

बिनकष्टाचे अपघाती पैसे 
मेहनतक्षमतेला अपंग करतात 
धडधाकट होऊन पैसे कमव 

१९४)
कुणाच्याही घरी, दुकानी, ऑफिसात 
वा रिअल इस्टेटीत 
मालकाच्या अनुमतीशिवाय शिरू नको  
कुठल्याच वस्तूला हात लावू नको 

वास्तूत शिरताच मालकास नमन कर 
त्याने अनुमती दिली तरच थांब 
त्याने जा म्हणून सांगताच निघ 

कुठल्याही वास्तूत 
वास्तूच्या मालकाच्या अनुमतीशिवाय 
काहीच करू नको 
काहीच बदल करू नको 

रिकामे असेल तरच आसनावर बस 
आसनावरून कुणालाही हाकलून लावू नको 
आजारी, अपंग, वृद्ध गरोदर स्त्रिया 
मुलापर्यंतच्या आया 
सर्वांना आसन दे 

चांगल्या कामासाठीच मसलत कर 
चांगल्या कामाचाच सल्ला दे 
वाईट कामाच्या योजनेत सहभाग टाळ 
इतरांनाही वाईट कामापासून परावृत्त कर 

खून आणि व्यभिचार 
दोन्हीपासून दूर रहा 

१९५)
ना कुणी आदिम होता 
ना कुणी आदिमा होती 

तू उत्क्रांत होऊन माणूस झालास 
आजही तू उत्क्रांत होत आहेस 

ईश्वराने माणूस निर्माण केला 
ही अफवा आहे 

आता जो आहेस 
त्यात ईश्वराचे काहीच योगदान नाही 

तू पृथ्वीवरील 
सर्वात चांगली घटना आहेस 

म्हणूनच तुझ्या माणूस असण्याचा 
उत्सव साजरा कर 

निसर्गाचे आभार मान 
आणि निसर्गाला दुखावता 
उत्क्रांत होत रहा

१९६)
लोभ स्वभावदत्त आहे  
म्हणूनच जे मिळते 
त्याचा वाटा करणे 
जीवावर येते 

पण लोभावर मात कर 
ज्याचा त्याचा वाटा 
ज्याला त्याला दे 

१९७)
तू कुणी उपरा नाहीस की कुणी परका 
तू कुणी पाहुणा नाहीस की कुणी पोरका 
तू ह्या पृथ्वीने तुझ्या मातापित्याद्वारे 
जन्माला घातलेले मांसल फुल आहेस 

मात्र तुझा सुगंध तुला तयार करण्याचे 
स्वातंत्र्य जबाबदारी तुझ्यावरच 
सोपवण्यात आली आहे 

तू विषही निर्माण करू शकतोस 
पण  तसे करणे 
हा तुझ्या आयुष्याचा दुरुपयोग आहे 

तेव्हा उमलत रहा, फुलत रहा
सुगंध तयार करून सर्वांना वाटत रहा 

१९८)
तूच सुख निर्माण करतोस तूच दुःख 
तूच वल्गना करतोस तूच कल्पना 
तूच स्वतःपासून पळतोस तूच स्वतःत परततोस 
तूच संकटात दुबळा होतास तूच बलशाली 
तूच सुस्थिती निर्माण करतोस  तूच दुःस्थिती 
तूच कर्मे करतोस 
आणि अंतिमतः तुझ्या सर्व 
कर्मांची जबाबदारी तुझीच आहे 
चांगले वा वाईट सर्व तुझेच कर्तृत्व आहे 

कुठलाच ईश्वर प्रेषित 
तुला वाचवू शकत नाही 
हे दुःखद पण कटू सत्य आहे 
त्यामुळे स्वतःलाच सशक्त कर 
तूच तुझी काठी हो 
तूच तुझा मार्ग 
तूच तुझा दिवा हो 
तूच तुझा प्रकाश 

हे शरीर तुझे आहे 
तुझ्या शरीराने जन्माला घातलेले 
हे तुझे जीवन तुझे आहे 

तुझे अस्तित्व ही तुला मिळालेली 
सर्वोत्कृष्ट देणगी आहे 
आणि तुझी माणुसकी 
ही सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे 

१९९)
मरेपर्यंत जगावेच लागते 
पण मरेपर्यंत पूर्ण भ्रमात जगणे 
ही शोकांतिका नव्हे काय 

ईश्वर नावाची दंतकथा 
कितीही कुणी चघळली 
तरी सत्य होणार आहे का ?

त्याऐवजी मृत्यू समोर ठेवून 
जे आयुष्य उरलय
ते आनंदाने जग 

जे करणे बाकी आहे 
आणि जे करणे शक्य आहे 
ते कर आणि मर 
इच्छांना मारून मरू नकोस 
इच्छांची पूर्ती करून मर 

तुझी मुले म्हणजे ह्या पृथ्वीवर उरलेला 
तूच आहेस 
तू तुझ्या मुलांच्यात अमर आहेस 
माणसाने मुलांना जन्मास घालून 
मृत्यूवर मात केली आहे 
मारण्यापूर्वी त्यांचे जे भले करता येईल 
ते कर 

माणसांनी तुला जन्मास घातले 
ह्या माणसांच्यातच तू जगलास 
आणि ह्या माणसांच्यातच तू मरणार आहेस 

मारण्यापूर्वी म्रुत्युपत्र वगैरे सर्व कागदपत्रे 
व्यवस्थित  तयार कर 
तुझ्या मृत्यूनंतर भांडणे नकोत 

मरताना आनंदाने मर 

२००)
खोट्या परलोकाची अभिलाषा नको 
तकलादू ईश्वराचा आधार नको 

इथेच जगलास 
इथेच मरशील

ह्या जगण्यामागे हेतू नाही 
ह्या सृष्टिमागे हेतू नाही 

आरश्यांनी एकमेकाला पहावे 
तसे हे आहे 

ही रचना व्यर्थ नाही 
पण जो अर्थ आहे 
तो मानवाने दिलेला आहे 

तुझ्या जगण्याचा हेतू 
'जगणे '
हाच होता 

तुझ्या रूपाने 
ही सृष्टी 
एक अप्रतिम आयुष्य जगली
आणि तुझ्या मृत्युद्वारा 
ती स्वतःच्या असण्याची एक शक्यता 
आता नाहीशी करत आहे 

ही  शक्यता आनंदमयी होती 
आनंदमयी आहे 
आणि मारतानाही तिला आनंदमयी राहू दे 

हा सूर्य मरणार आहे  
ही पृथ्वी मरणार आहे 
ही सूर्यमाला मरणार आहे 

मरण कुणालाच चुकले नाही 
आणि तू तर फक्त अंश आहेस 

निवाडा नाही 
अंतिम न्याय नाही 
तुझ्या चांगल्यावाईटाचा निर्णय नाही 

आहे ती  फक्त मरणार ह्याची जाणिव 
तिला उरात घेऊन तडफडू नकोस 
जी तुझी जगण्याची शक्यता होती 
ती  शक्यता तू निभावलीस 

निरोप घेताना पश्चाताप नको 
सर्वच गोष्टी करून होत  नाहीत 
जे जमले नाही त्याचा शोक नको 

एकेक नाते ऑफ कर 
एकेक संबंध ऑफ कर 

आतील रिक्तता उफाळतीये 
तिला मोराचा डौल प्राप्त करू दे 

असा जा 
जसा अस्तित्वात नव्हतास 

असा जा 
जसा तुझा शेवटचा सुगंध 
आता उडत चाललाय 

सुगंधित हो 
शेवटचा
***
शेवट